अलिबाग तालुक्यातील महत्त्वाचे भगवान शंकराचे देवस्थान!! दक्षिणोत्तर पसरलेल्या डोंगररांगेवर वसलेले हे देवालय साधारणतः हजार बाराशे वर्षांपूर्वी चे असावे.
मंदिराची डोंगरवाट –
कनकेश्वर मंदिर रस्त्यापासून सुमारे तीन किलोमीटर डोंगरावर चढून जावे लागते. डोंगरावर चढायला प्रचलित तीन वाटा आहेत, एक मापगांवातून बांधलेली पाखाडी जो प्रमुख मार्ग आहे. बहिरोळे आणि झिराडमधूनही पाऊलवाटा आहेत. साधारण साडेसातशे पायऱ्या आहेत. बराचसा मार्ग झाडीमुळे सावलीतून जातो. हा पूर्ण रास्ता तीन भागात विभागाला गेलाय. हे विभाग म्हणजे आपण नक्की कोठे आहोत हे कळण्यासाठी प्रचलित झाले आहेत. सुरवातीला अर्धा किलोमीटर चढ जाणवतो, पुढे एक किलोमीटर हसतखेळत तुम्ही केव्हा चढता हे कळत नाही, एकदा गायमंडीशी पोहोचलात की पुढचे दिड किलोमीटर अंतर सपाटी आणि घनदाट सावलीमुळे पंधरा मिनिटांत पार होते. देवळाच्या पठारावर पूर्ण निबिड जंगल आहे, उत्तम जैवविविधतेचा अभ्यास करण्यासाठी चांगली जागा आहे. अनेक प्रकारची झाडे प्रयत्नपूर्वक लावलेली आहेत. या टेकडीवर गर्द झाडी असल्याने अनेक प्रकारचे दुर्मिळ पक्षी येतात. त्यांचा सुमधुर आवाज आपल्याला अनुभवता येतो. येथे अनेक पक्षी निरीक्षक या दुर्मिळ पक्षांचा अभ्यास कार्रण्यासाठी येतात. देवस्थानाची तिनशेचारशे एकर घनदाट अरण्य असलेली जमिन आहे. येथे विविध प्रकारच्या वनौषधी वनस्पतीं देखील आहेत.
ब्रह्मकुंड –
टेकडीच्या चढताना मधेच एक पाण्याची टाकी बांधलेली आहे. टेकडी चढून वर गेलो कि तुमचे स्वागत करते एक मोट्ठी कमान. पुढे एक हनुमानाचे देऊळ आहे व शेजारीच एक सुंदर पायऱ्यांनी बांधलेली पुष्करणी आहे. पावसाळ्यामध्ये हि पुष्करणी पूर्ण भरून जाते. यालाच ब्रह्मकुंड असेही म्हणतात. येथे पोहायला खूप मजा येते.
मंदिर-
पुढे गेलात कि दिसतो तो स्थापत्यदृष्ट्या सुंदररित्या बांधलेला सोळा कोनांचा तलाव. या तलावाला जोडूनच मंदिर आहे. राष्ट्रकूट काळातील देवळाचा गाभारा साक्ष देतो तर वरील बांधकाम चालुक्य, शिलाहार काळातील असावे. कळसाचे बांधकाम गेल्या शंभर दोनशे वर्षांपूर्वी चे असावे, तर सभामंडप प.पू. श्रीधरस्वामींचे शिष्य गुरुपादस्वामींच्या नियोजनाखाली झालेले आहे. देवालयातील पिंडीचे स्थान आत जमिनीत आहे, स्थानावर चांदीचे लेपन झाले आहे. गाभारा प्रशस्त असून सुंदर शास्त्रोक्त बांधकाम आहे. दरवाजासमोर भव्य नंदी आहे, उजव्या हाताला साक्षगणपती आहे.देवालयात अखंड नंदादीप असून त्रिकाळ पूजा पंडित व गुरवाकडून केली जाते. श्रावणात कमळपूजा, पौषात महारुद्र, दसऱ्याला पालखी आणि सोने लुटण्याचा कार्यक्रम असतो. महाशिवरात्री, श्रावणी सोमवार, त्रिपूर पोर्णिमा म्हणजे कनकेश्वरी मोठ्या यात्रा असतात. हजारो लोक येथे दर्शनाला येतात.
देवळाजवळच लंबोदर स्वामींनी स्थापलेले पुष्टीपती रामसिध्दीविनायक मंदिर आहे. तसेच मंदिरापासून थोड्याच अंतरावर श्री कृष्ण व बलराम यांचे सुद्धा मंदिर आहे.
मंदिर परिसारात भक्तांसाठी रहायला धर्मशाळा आहेत. पाण्याची सोय आहे. येथे जेवणाची सुद्धा छान सोय होते. पावसाळ्यात येथील वातावरण खुपच रम्य असते. या टेकडीवर बरेच जण पाय मोकळे करण्यासाठी व व्यायामासाठी येतात.
कसे पोहोचाल:-
- अलिबाग ते कनकेश्वर :- १३ किमी
- अलिबाग पुणे अंतर :- १४५ किमी
- अलिबाग मुंबई अंतर :- १२० किमी
जवळील आकर्षण –
- खांदेरी किल्ला (१३ किमी )
- मांडवा जेट्टी (१० किमी )
- करमरकर शिल्पालय (१० किमी )