मुरुड गावाजवळील खोल समुद्रामध्ये पद्मदुर्ग किल्ला आहे. “जंजिरा” किल्ल्यात असलेल्या सिद्दीचा उपद्रव कोकण किनारपट्टीवर वाढत चालला होता. सिद्दीच्या समुद्रातील हालचालींवर नियंत्रण आणण्या साठी छत्रपती शिवाजी महाराज यांनी मुरूडच्या समुद्रात असलेल्या या खडकाळ बेटावर “पद्मदुर्ग” हा किल्ला बांधला. सिद्दीशी सामना करत रात्र दिवस एक करीत मराठी मावळ्यांनी या किल्ल्याची उभारणी केली.
किल्ल्याचा इतिहास :
महाराजांनी साधारणतः इ.स. १६७० च्या दरम्यान पासून सिद्दी च्या जंजिरा काबीज करण्यासाठी मोहीमा आखल्या. यामध्ये मोरोपंत पिंगळे, येथील स्थानिक कोळी लाय पाटील व त्यांच्या सहकार्यांनी फार धाडसाची भूमिका बजावली. संभाजी महाराजांच्या कारकिर्दीत पद्मदुर्ग स्वराज्यात होता. संभाजी महाराजांच्या मृत्यूनंतरही १६८० मध्ये हा किल्ला मराठ्यांच्या ताब्यात असल्याचा उल्लेख इंग्रजांच्या पत्रात आहे. त्यानंतर पद्मदुर्ग सिद्धीच्या ताब्यात गेला. मराठयांनी पेशवे काळात परत तो जिंकून घेतला.
किल्ल्याची माहिती :
“पद्मदुर्ग” किल्ल्याचे दोन भाग आहेत. एक मुख्य किल्ला आणि त्या समोरील पडकोट. पडकोट मोठ्या प्रमाणावर नामशेष होत आला आहे, परंतु मुख्य किल्ल्याची तटबंदी मात्र अजूनही शाबूत आहे. मुख्य दारासमोरील मोठा बुरुज तग धरून उभा आहे. या किल्ल्याचा वरचा भाग फुललेल्या कमळाच्या पाकळ्याप्रमाणे दिसतो . म्हणूनच याला पद्मदुर्ग असे नाव दिले असावे. या किल्ल्याच्या बांधकामाचे एक वैशिष्ट्य येथे पहावयाला मिळते. तटबंदीच्या दोन दगडांमधे चुना भरून बांधकाम केले आहे. मुख्य किल्ल्यामध्ये चौकोनी विहीर, तोफा, इमारतींचे अवशेष पाहता येतात. पद्मदुर्गाच्या महाद्वारामधे प्रवेश करण्यासाठी चार-पाच पायऱ्या चढाव्या लागतात. दाराच्या आतल्या बाजूला पहारेकऱ्यांसाठी केलेल्या देवड्या आहेत. किल्ल्याच्या तटावर जाण्यासाठी पायऱ्यांचा मार्गही आहे. मधल्या भागामधे नव्या जुन्या वास्तूंचे अवशेष पहायला मिळतात. चारही बाजूंनी खारे पाणी असताना आतमधे गोड्या पाण्यासाठी चार टाकी केलेली दिसतात. या किल्ल्याच्या तटबंदीवरून जंजिरा आणि सामराजगड किल्ले दिसतात. तसेच येथून मुरूडचा किनाराही उत्तम दिसतो.
मुरुडची ग्रामदैवत श्री कोटेश्वरी –
किल्ल्याच्या बाजूला असलेल्या पडकोटामध्ये श्री कोटेश्वरी देवीचे मूळ स्थान आहे. कोट म्हणजे किल्ला आणि ईश्वरी म्हणजे देवी, म्हणून कोटेश्वरी हे नाव. श्री कोटेश्वरी देवी हि मुरुड ची ग्रामदैवत आहे व देवीचे मंदिर मुरुडच्या प्रवेशाजवळच आहे. किल्य्यातील देवीजवळ एक लाकडी अर्धवट खांब उभा आहे, व ह्या खांबाचा उर्वरित भाग मुरुडमधील देवीच्या मंदिरासमोर उभा आहे.
किल्ल्यावर कसे पोहोचायचे :
पद्मदुर्गावर जाण्यासाठी मुरुड गावातून राजापुरीला जाणारा रस्ता आहे या रस्त्यावर खाडीलगत एकदरा गाव आहे तिथल्या खोरा बंदरावरून किल्ल्यावर जाता येते. कोळी लोक बोटीने समुद्राचा व हवामानाचा अंदाज पाहून किल्ल्यात घेऊन जातात. किल्ला नौदलाच्या ताब्यात आहे. त्यामुळे तेथे जाण्यासाठी त्यांची परवानगी लागते.
- अलिबाग मुरूड अंतर : ५० किमी,
- पुणे-मुरुड अंतर १५० किमी, (ताम्हिणी मार्गे )
- मुंबई-मुरुड अंतर १५० किमी
जवळचे आकर्षण –
- जंजिरा किल्ला ( जवळच )
- कुडा मांदाड लेणी ( २१ किमी )
- मुरुड समुद्रकिनारा ( ५ किमी )
- काशीद समुद्रकिनारा ( २१ किमी )