अलिबागला जोडूनच असलेले रामनाथ येथील श्री राम मंदिर हे सुद्धा आंग्रेकालीन इतिहासाची साक्ष देते. मंदिराच्या जागेच्या मालक व श्री रामजी देवस्थान रामनाथ यांच्या मुख्य ट्रस्टी निरुपा पारेख यांच्याकडून मंदिराची माहिती मिळाली.
इतिहास –
साधारणतः दोनशे तीस वर्षे जुने हे राम मंदिर कान्होजी आंग्रे यांचे दिवाण श्री गोविंद रेवा शेठ यांनी त्यांच्या भावाच्या स्मृतीसाठी बांधलेले आहे. मंदिराचा मुख्य गाभारा व समोरील गोल घुमट या पूर्ण दगडामध्ये सुरुवातीला बांधले गेले व बाहेरील लाकडी कौलारू सभामंडप नंतर बांधण्यात आला. गाभाऱ्यामध्ये श्री राम , सीता व लक्ष्मणाच्या संगमरवरातील सुबक मूर्ती आहेत. आजूबाजूचा साधारणतः सात एकराच्या परिसरात बरीच जुने वृक्ष आढळतात. मंदिराच्या अगदी समोर एक पोखरण आहे व भोवताली दोन दीपमाळा व दोन तुळशीवृंदावन आहेत. मंदिराच्या मागच्या बाजूस उजवीकडे अजून एक मोठी पोखरण आहे. मंदिराच्या समोर उजवीकडे एक भलेमोठे साधारणतः दोनेकशे वर्षे जुने पिंपळाचे झाड असून त्याखाली श्री हनुमानाचे मंदिर आहे, येथे सुद्धा बरेच भाविक येत असतात.
उत्सव –
मंदिरामध्ये रामनवमी चा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा होतो. पूर्वी हा उत्सव नऊ दिवस चालत असे. गुढी पाडवा ते राम नवमी पर्यंत हा उत्सव भजन कीर्तनासह मोठ्या उत्साहाने साजरा होत असे.
असे हे आंग्रेकालीन अष्टागारातील इतिहासाची साक्ष देणारे प्राचीन मंदिर नक्की पहा.
कसे पोहोचाल –
रामनाथ हे अलिबाग ला लागूनच असलेले ऐतिहासिक गाव. रामनाथ गावामध्येच हे मंदिर स्थित आहे
- अलिबाग रामनाथ अंतर १.५ किमी
- अलिबाग पुणे :- १४५ किमी
- अलिबाग मुंबई :- १२० किमी
जवळचे आकर्षण –
- वरसोली समुद्रकिनारा (१.५ किमी )
- वरसोली विठ्ठल मंदिर ( १ किमी )
- अलिबाग समुद्रकिनारा (२ किमी )