आवास
आवास म्हणजे देव देवतांचा वास असलेले ठिकाण, येथे असलेल्या बऱ्याच देवदेवतांच्या अस्तित्वामुळे या गावाला नाव पडले आवास. अलिबागच्या पश्चिम किनारपट्टीवर असलेले निसर्गरम्य गाव.
इतिहास
सुमारे पाचशे वर्षांपूर्वी नागोबा नावाचे साधू श्री रामेश्वर, श्री गोकर्ण महाबळेश्वर, श्री परशुराम, श्री हरिहरेश्वर वैगेरे तीर्थ करून दक्षिणेकडून पश्चिमेस असलेल्या समुद्रकिनाऱ्यावरील श्री स्वयंभू गणपतीचे दर्शन घेण्याकरिता अलिबाग तालुक्यातील आवास या गावी आले. गणपतीचे दर्शन घेऊन कनकेश्वराचे सुद्धा दर्शन घेता येईल या उद्देशाने ते आवास येथे वस्तीस राहिले परंतु वक्रतुंडाच्या कृपेने ते भक्तांच्या अधीन झाल्याने त्यांना कनकेश्वराचे दर्शन घेता आले नाही.
आवास या गावी नागोबा साधू राहत असताना त्यांना चांगोबा आणि बुधोबा हे दोन शिष्य होते . नागोबा साधुंकडे वैद्यक शास्त्राची सुद्धा माहिती होती. ते शेषनारायणाला फ़ार मानत असत. शेषनारायणाबद्दल त्यांना काही प्रमाणात अनुभूती सुद्धा अली होती. आवासच्या किनाऱयावे केवड्याची खूप झाडे होती व तेथे विषारी जनावरे सुद्धा होती. पण त्यांचा या साधून काहीही उपद्रव झाला नाही. नागोबा साधू आवास ला राहायला आल्यापासून तेथील परिस्थितीत फार मोठा फरक पडला पाऊसपाणी चांगला पडायला लागला,पिके चांगली येऊ लागली, गावातील रोगराई नाहीशी झाली विषारी जनावरांची भीती नाहीशी झाली. हे नागोबा साधू नंतर तेथे बरीच वर्षे राहिले. पण नंतर त्यांनी समाधी घेतली, नंतर त्यांनी सांगितल्याप्रमाणे त्यांच्या समाधीतून तीन सर्पाकृती ठसे लाकडावर दिसू लागले. तसेच साधूंनी सांगितले कि जो कोणी त्या नागांची पूजा अर्चा करेल त्याचे दारिद्र्य व दुःखाचा नाश होईल. तसेच ते समाधिस्थ झाल्यावर समाधीच्या दिवशी नागोबाची ठसा करून नारायण शब्दाने जयजयकार करून प्रत्येक वर्षी कणकेश्वरास दर्शनास नेण्यात यावे. तेव्हापासून नागोबाच्या यात्रेच्या दुसऱ्या दिवशी नागोबाची पालखी गावात फिरवून कणकेश्वरास नेण्याची प्रथा अजूनही पाळली जाते.
उत्सव व परंपरा
सर्पदंश झालेल्या माणसास येथे आणले तर त्याच्या अंगातील विष उतरून तो बारा होतो अशी श्रद्धा आहे. लाकडावरीन तीन सर्पकृतीचे सुद्धा आपल्याला दर्शन घेता येते. कार्तिक शु चतुर्दशी ला आवास येथे अलिबागमधील पहिली मोठी यात्रा भरते. भक्तांनी श्री नागोबांकडे मागितलेली प्रत्येक गोष्ट त्यांना मिळते. आणि अत्यंत श्रद्धेने भाविक येथ येऊन गाभाऱ्यात लहान मोठ्या आकाराच्या घंटा बांधतात आणि नागोबा देवाचा जयजयकार करतात.
असे हे जुन्या धाटणीचे असलेले कौलारू मंदिर, समोर मोठे पटांगण असून भली मोठी दोन जुने वृक्ष आहेत , जवळच एक दीपमाळ सुद्धा उभी आहे. ह्या मंदिराच्या बाजूनेच समुद्राकडे जाण्याचा रास्ता आहे . जवळच एक मारुतीचे जुने मंदिर सुद्धा आहे. मंदिराच्या बाजूने असलेल्या रस्त्याने तसेच पुढे गेलो व नंरत डावीकडे अजून १-२ किमी गेल्यावर लागते ते अजून एक ऐतिहासिक पाणबादेवीचे मंदिर.
असे हे ऐतिहासिक कथा सांगणारे प्राचीन मंदिर एकदा तरी पाहायलाच हवे