वरसोली – अलिबागला लागूनच असलेले आणि आंग्रेकालीन अष्टागरामधील एक महत्वाच गाव. येथील निसर्गरम्य समुद्रकिनारा पर्यटकांना नेहमीच आकर्षित करतो. याच किनाऱ्यावर जाताना मधेच डाव्या बाजूला एक जुने कौलारू मंदिर लागते ते बेलेश्वराचे मंदिर.
इतिहास –
साधारणतः सन ११११ च्या दरम्यानचे हे मंदिर आहे. मंदिर परिसराची जागा कान्होजी आंग्रे यांच्या मालकीची होती. नंतर हि जागा ब्रिटिश सरकार कडे गेली, सन १८६४ साली ब्रिटिश सरकारने हि जागा येथील राऊळ घराण्याकडे दिली. सध्या मंदिराची देखभाल याच राऊळ घराण्याकडे आहे.
मंदिर –
अलिबाग परिसरामध्ये असलेल्या अनेक पुरातन मंदिरांप्रमाणेच या मंदिराची रचना असल्याचे दिसून येते. बाहेरून दिसायला चौपाकी घराप्रमाणे तर आतमध्ये गाभाऱ्याला छोटासा घुमट, आणि समोर नक्षीदार खांब असलेला सभामंडप.
मंदिर पूर्णपणे दगडी असून त्यावर चुन्याचा थर देण्यात आला आहे. मंदिराच्या सभामंडपाचे लाकडी खांब व त्याचे कोरीव काम पहिले कि त्याच्या पुरातनकाळाची खात्री पटते. मंदिराचे प्रवेशद्वार मंदिराच्या मानाने फार लहान आहे. म्हणजे मंदिरात प्रवेश करताना वाकूनच आतमध्ये जावे लागते. साधारणतः २ फूट रुंदीच्या भिंती मजबूत बांधकामाची साक्ष देतात. सन १९२७ साली मंदिराच्या सभामंडपाला फरशी बसवली गेली. मंदिरासमोरच नंदीचा छोटासा मंडप असून बाजूला दोन दीपमाळा आहेत. नंदीमंडप लागूनच एक फार प्राचीन वटवृक्ष होता पण २०२० च्या वादळामध्ये त्याचा बराचसा भाग कोसळला.
ऐतिहासिक शिलालेख व अवशेष –
मंदिराच्या उजव्या बाजूला एक शिलालेख सापडतो. त्याच्याकडे कोणी लक्ष न दिल्यामुळे तो दुर्लक्षित आहे. या शिलालेखाचे वाचन व संवर्धन करणे आवश्यक आहे. जवळच एका मोठ्याश्या दीपमाळेचे दगड दुर्लक्षित अवस्थेत पडलेले आहेत. मंदिराला लागूनच समुद्राकडे जाणारा रास्ता आहे रस्त्यापलीकडे अजून दोन लहान दीपमाळा आहेत व एक जुनी पुष्करिणी दुर्लक्षित अवस्थेत आहे. यातील पाणी सध्या अस्वच्छ झालेले आहे. या सर्वच परिसराचे व सर्व पुरातन अवशेषांचे संवर्धन करणे गरजेचे आहे.
वरसोली च्या समुद्रकिनाऱ्यावर आपण बऱ्याच वेळा जातो, पण वाटेवरच असलेले हे ऐतिहासिक मंदिर न विसरता पहा नक्की,
Amenities
- Bike Parking
- Car Parking