फणसाड वन्य जीवअभयारण्य – मुरुड तालुक्यातील एक निसर्ग व जैव विविधतेने नटलेले समृद्ध अभयारण्य .
शहराच्या ठिकाणी मे महिन्याच्या उन्हाच्या झळा लागत असताना फणसाड येथील हवामान मात्र फारच सुखद होते. गर्द झाडी, उन्हाळ्याच्या मानाने थंडगार वाटणारा वारा आणि सोबत विविध पक्षांचा किलबिलाट, महाराष्ट्रातून विविध ठिकाणांहून आलेले प्राणी व पक्षी प्रेमी, आणि सोबतीला येथील स्थानिक व अधिकाऱ्यांनी केलेली व्यवस्था, पाणवठ्याशेजारी महिनाभर कष्ट घेऊन बांधलेले मचाण – सारे काही अविस्मरणीय व आयुष्यातून एकदा तरी नक्कीच अनुभवण्यासारखे.
वन्य पशु पक्षी गणना -
दर वर्षी मे महिन्यात बुद्ध पौर्णिमेला संपूर्ण भारत देशामध्ये विविध ठिकाणी प्राणी आणि पक्षी गणना होते. या पौर्णिमेला चंद्र प्रकाश जास्त प्रमाणात असतो त्यामुळे रात्रीच्या अंधारात सुद्धा हे वन्य जीव दिसू शकतात. हि गणना पशु पक्षी यांच्या संवर्धनासाठी फार महत्वाची असते. यातून आपल्याला मोठ्या प्रमाणात पशु पक्ष्यांच्या विषयी, त्यांच्या सवयी, स्थलांतरे, वाढणारी किंवा कमी होणारी संख्या, इत्यादी माहिती मिळते.
निसर्गानुभव कार्यक्रम २०२४-२५ -
शासनातर्फे फणसाड वन्य अभयारण्य येथील वन अधिकारी दर वर्षी हा कार्यक्रम आयोजित करतात. या पशु पक्षी गणनेचा एक भाग म्हणून alibagonline ची टीम फणसाड येथील प्राणिगणनेमध्ये ह्या वर्षी सहभागी झाली. महिनाभर आधीच हि बातमी आल्याने विविध प्राणी आणि पक्षी प्रेमी यांनी आपली नावे देऊन ठेवली. ठरल्याप्रमाणे २३ मे रोजी सर्व जण फणसाड च्या सुपेगाव येथील मुख्य प्रवेशाजवळ जमले. नंतर वनपरिक्षेत्र अधिकारी श्री तुषार काळभोर व त्यांची पूर्ण टीम यांनी कार्यक्रमाची सूत्रे हाती घेतली. प्रस्तावना झाल्यावर सर्वांची ओळख करून देण्यात आली. आणि साधारणतः १३ गट बनवले, प्रत्येक गटाला एक वनरक्षक, आणि त्यांना नेमून दिलेला पाणवठा / गाण. उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये तलावातील पाणी कमी होत असल्याने येथे बऱ्याच ठिकाणी छोटे कृत्रिम पाणवठे तयार केलेले असतात , व त्यामध्ये दिवसाआड पाणी टाकले जाते.
संध्याकाळचा चहा झाल्यावर रात्रीचे जेवणाचे डबे सोबत घेऊन सर्व टीम आपापल्या नेमून दिलेल्या ठिकाणी गेल्या. सोबत प्राणी गणनेसाठी एक पत्रक दिले गेले. याच्या पुढील कार्यक्रम म्हणजे त्या पाणवठ्याशेजारी एका झाडावर बांधलेल्या मचाणावर जाऊन रात्रभर बसणे आणि दिसलेल्या प्राण्याची नोंद करून ठेवणे, सोबत विविध पक्षांच्या आवाजाची सुद्धा नोंद करायची होती. सर्वात महत्वाचे म्हणजे तुम्ही कितीही बोलके असाल तरी येथे मात्र तोंडातून एकही शब्द बाहेर काढायचा नसतो, व शक्यतो हालचाल सुद्धा करायची नाही. कारण काही छोटे वन्य जीव तुमचा आवाज ऐकून व हालचाल पाहून दूर जाण्याची शक्यता असते.
समृद्ध निसर्गानुभव -
आम्ही भांडव्याचा माळ येथे गेलो होतो. आजूबाजूला मोठा मोकळा परिसर त्यावर सुकलेले गवत, व त्याच्या चारही बाजूने जंगल. एखादा प्राणी आला तर लगेच दृष्टीत येणारा. आभाळ थोडे ढगाळ होते. जसजसा सूर्य मावळायला लागला तसतसे विविध पक्षांचे आवाज ऐकू येऊ लागले, मधूनच एखादे लंगूर ओरडायचे. मचाण एका अंजनी च्या झाडावर असल्याने एखादा चमचमणारा काजवा अचानक भेट देऊन जायचा. रोजच्या धकाधकीच्या जीवनातून बाजूला होऊन, आजची रात्र आम्ही एका जंगलात, तेसुद्धा एका मचाणावर बसून, पूर्णतः निसर्गाच्या सानिध्यामध्ये अनुभवत होतो. हा अनुभव विलक्षण होता. इतकी वर्षे अलिबागमध्ये राहून, येथील जंगल, निसर्ग व वन्य जीवन आम्ही पहिल्यांदा अनुभवत होतो.
रात्री ९ च्या सुमारास चंद्र दिसू लागला, वातावरण थोडे ढगाळ असल्याने चांदण्यांचा सुद्धा लपंडाव चालू होता. आमचे लक्ष जवळच्या पाणवठ्यावर होते. रात्री साधारणतः ११ च्या सुमारास माळरानावरून दोन काळ्या आकृती येताना दिसल्या. थोडे जवळ आल्यावर कळले कि ती एक सांबराची जोडी होती. कदाचित आमची चाहूल त्यांना लागली असावी म्हणून थोड्या वेळाने हि जोडी जवळच्या झाडीमध्ये दिसेनाशी झाली. विविध पक्ष्यांचे आवाज निरंतर चालू होते, आमच्या सोबत असलेले वनरक्षक श्री मधुकर नाईक यांनी सुद्धा आम्हाला बरीच माहिती दिली. मध्यरात्री पक्षांचा आवाज थोडा मंदावला आणि निरव शांतता पसरली. मधूनच एखादे घुबड आवाज करायचे.
ऐकलेल्या सर्व पक्षांच्या आवाजाची नोंद पत्रकामधे केली, सकाळचे ५ च्या सुमारास पूर्वेला उजेड दिसू लागला, आणि मग परत पक्षांचा किलबिलाट सुरु झाला. रात्रीचे पक्षी वेगळे आणि हे सकाळचे किलबिलणारे पक्षी वेगळे. येथील सारे काही आमच्यासाठी वेगळेच होते, पण ते होते त्या पक्षांचे, वन्य प्राण्यांचे खरे घर. नंतर आम्ही ६ च्या सुमारास मचाणावरून खाली उतरलो आणि पायी चालत परत आलो. वाटेमध्ये विविध पक्षी, कोळी, माकडे दिसली.
या सर्व कार्यक्रमाची अगदी चोख व्यवस्था केल्याबद्दल वनपरिक्षेत्र अधिकारी श्री तुषार काळभोर व त्यांची पूर्ण टीम यांचे खूप खूप आभार.