अलिबाग पासून ५० किमी वर मुरुड हे गाव आहे. मुरुडच्या जवळ जंजिरा हा किल्ला आहे. बेटावर बांधलेला आणि चोहो बाजूने समुद्राने वेढलेला असल्यामुळे या किल्ल्याला जंजिरा हे नाव पडले हा किल्ला कुणालाही जिंकता आला नाही. शिवाजी महाराज, संभाजी राजे, कान्होजी आंग्रे यांनी हा किल्ला जिंकण्यासाठी प्रयत्न केले पण हा किल्ला अजेय राहिला.
किल्ल्याचा इतिहास :
“जंजिरा” हा शब्द अरबी भाषेतून आपल्याकडे रुढ झालेला आहे. अरबी भाषेतील जझीरा या शब्दावरुन तो आलेला आहे. जझीरा म्हणजे बेट. हा किल्ला बेटावर बांधला गेला असल्या कारणाने त्याला जंजिरा असे नाव पडले. पूर्वी या बेटावर मेढेकोट होता. मुरुड जवळ असलेल्या राजापुरीला त्यावेळी कोळी लोकांची वस्ती होती. या कोळी लोकांना लुटारूचा कायम उपद्रव होत असे. या लुटारूंपासून बचाव करण्यासाठी बेटावर मेढेकोट उभारण्यात आला. मेढेकोट म्हणजे लाकडाची मोठे ओंडके एकावर एक रचून करण्यात आलेली तटबंदी. या मेढेकोट मध्ये कोळी लोक सुरक्षित रहात होते. त्यांचा प्रमुख होता राम पाटील. त्यावेळी निजामाची हुकुमशाही होती. मेढेकोटची सुरक्षितता लाभल्यावर राम पाटील निजामी ठाणेदाराला जुमानत नव्हता. त्यामुळे ठाणेदाराने पीरम खानाच्या मदतीनी त्याचा बंदोबस्त केला आणि मेढेकोट ताब्यात घेतला. पुढे पिरम खानाच्या जागी बुर्हाणखानाची नेमणूक झाली. त्याने तेथे भक्कम किल्ला बांधण्याची परवानगी निजामाकडून मिळवली. सध्याचे जे बांधकाम आहे ते या बुर्हाणखानाने बांधलेले आहे. पुढे इ.स.१६१७ मध्ये सिद्दी अंबर याने बादशहाकडून स्वतंत्र सनद मिळवून जहागिरी प्राप्त केली. जंजिरा संस्थानचा हा मूळ पुरुष समजला जातो.
जंजिर्याचे सिद्दी हे मूळचे अबिसीनियामधील असून, हे दर्यावर्दी शूर, काटक व दणकट होते. त्यांनी प्राणपणाने जंजिरा लढवला. इ.स.१६१७ ते इ.स.१९४७ अशी ३३० वर्षे जंजिरा अंजिक्य राहिला.
२० सिद्दी सत्ताधीशांनंतर आलेल्या सिद्दी मुहमंदखान हा शेवटचा सिद्दी असताना, व त्या राज्याच्या स्थापनेनंतर ३३० वर्षांनी, म्हणजे ३ एप्रिल १९४८ रोजी ते राज्य भारतीय संघराज्यात विलीन झाले.
किल्ल्याची माहिती :
जंजिर्याचे प्रवेशद्वार पूर्वाभिमुख आहे. होडीने किल्ल्याच्या प्रवेशद्वारापर्यंत पोहोचल्यावर, या प्रवेशद्वाराच्या आत एक उपदार आहे. जंजिर्याची तटबंदी बुलंद आहे. त्याला सागराकडे ही एक दरवाजा आहे. असे एकोणीस बुलंद बुरूज आहेत. दोन बुरुजांमधील अंतर ९० फुटांपेक्षा जास्त आहे. तटबंदीवर जाण्यासाठी जागोजाग पायर्या ठेवलेल्या आहेत. तटबंदीमध्ये कमानी आहेत. त्या कमानीमध्ये तोंड करून तोफा ठेवलेल्या आहेत. जंजिर्यावर ५१४ तोफा असल्याचा उल्लेख आहे. यातील कलालबांगडी, लांडाकासम व चावरी या तोफा आजही पाहायला मिळतात. जंजिर्याच्या तटबंदीवरुन विस्तृत प्रदेश दिसतो. यात समुद्रात बांधलेला पद्मदुर्ग व किनार्यावरील सामराजगड हेही येथून दिसतात. तसेच लांबवर पसरलेला अथांग सागर या तटबंदीवरून बघताना डोळ्याचे पारणे फिटते. हा अनुभव घेण्यासाठी पर्यटक मोठ्या संख्येने मुरुडला येतात, मुरुड गावात पर्यटकांच्या सोयी साठी अनेक हॉटेल्स तसेच घरगुती कॉटेज उपलब्ध आहेत. किल्यावरील सफर आणि समुद्र किनारा अनुभवण्यासाठी नक्कीच मुरुडला भेट दिली पाहिजे.
किल्ल्यावर कसे पोहोचायचे :
रायगड जिल्ह्याच्या पश्चिमेला अरबी समुद्र आहे. या समुद्राला लागूनच मुरुड तालुक्यातील मुरुड नावाचे गाव आहे. मुरुडच्या पुढे दंडा आणि राजपुरी ही गावे समुद्रकिनारी आहेत. मुरुडपासून राजपुरी चार पाच किलोमीटर अंतरावर आहे. हे गाव खाडीच्या किनार्यावर वसलेले आहे. या राजपुरी गावाच्या पश्चिमेला समुद्रात एका बेटावर मुरुड-जंजिराआहे. राजपुरीहून या किल्ल्यावर जाण्यासाठी शिडाच्या होड्यांची सोय आहे. अलिबाग ला भेट देण्यासाठी येणारे पर्यटक मुरुडला येऊन जंजिरा किल्ल्याला भेट देतात. विस्तीर्ण पसरलेला समुद्र आणि मध्ये उभा असलेला हा जलदुर्ग देखणा दिसतो. या किल्ल्याचे विशिष्ट्य म्हणजे किनाऱ्यावरून पहिले तर प्रवेशद्वार कुठे आहे हे नक्की कुणाला कळत नाही. इथले कोळी बांधव पर्यटकांना होडीतून किल्ल्यावर घेऊन जातात.
- अलिबाग मुरूड अंतर : ५० किमी,
- पुणे-मुरुड अंतर १५० किमी, (ताम्हिणी मार्गे )
- मुंबई-मुरुड अंतर १५० किमी
भेट देण्यासाठी योग्य काळ :
जंजिरा किल्ल्याला भेट देण्यासाठी ऑक्टोबर पासून मे -जून पर्यंतचा काळ योग्य आहे. जून ते सप्टेंबर पावसाळ्यात हवामानातील बदलामुळे हा किल्ला पर्यटनासाठी बंद असतो.
जंजिरा किल्ल्यात राहण्याची व्यवस्था नाही. परंतु मुरुड मध्ये अनेक हॉटेल्स व घरगुती रहाण्याची व्यवस्था आहे.
किल्ल्यात खाण्याची व्यवस्था नाही त्यामुळे खाण्याचे पदार्थ तसेच पिण्यासाठी पाणी हे सोबत घेऊन गेल्यास किल्ला भटकंती करताना अडचण येणार नाही. परंतु किल्ल्यावर कचरा होणार नाही याची काळजी पर्यटकांनी घेणे आवश्यक आहे. खाद्य पदार्थ सोबत नेल्यास इथल्या परिसरात रिकाम्या पिशव्या बाटल्या खरकटे अथवा इतर कुठल्याही प्रकारचा कचरा होणार नाही याची दक्षता घेणे आवश्यक आहे. परिसराची स्वच्छता राखणे हि सर्वांची जबाबदारी आहे. किल्ल्याला भेट देताना याचे भान प्रत्येकाने ठेवले पाहिजे.
जवळचे आकर्षण –
- पद्म दुर्ग ( जवळच )
- कुडा मांदाड लेणी ( २१ किमी )
- मुरुड समुद्रकिनारा ( ५ किमी )
- काशीद समुद्रकिनारा ( २१ किमी )