सुपारी संघ मुरुड (SSM)
सुपारी संघ मुरुड SSM
मुरुड तालुक्यातील गावातील उत्तम प्रतीच्या सुपारीच्या उत्पादनाला योग्य बाजारपेठ व बाजारभाव मिळावा ह्या उद्धेशाने मुरुड येथील व्यापारी दूरदृष्टी असलेली काही मंडळी एकत्र आली, व त्यांनी स्थापन केला येथील सर्वात पहिला सुपारी संघ. मुरुड गावातील व तालुक्यातील सुकलेली सुपारी गोळा करायची आणि त्याचे रोठे काढून वर्गवारी करून मुंबई सारख्या शहरामध्ये विकायची, आणि आलेला नफा सुपारी उत्पादकांना वितरित करायचा हा शुद्ध व समाजोपयोगी हेतू.
स्थापना व इतिहास –
पूर्वी मुरुड येथील स्थानिक सुपारी उत्पादक शेतकऱ्यांना सुपारीचा भाव हवा तास मिळत नसे. तसेच आजुबाजुंचे व बाहेरील व्यापारी येथे येऊन सुपारी कमी भावाने विकत घेत असत. त्यामुळे स्थानिक शेतकऱ्यांना एकत्र येणे गरजेचे होते. जेणे करून ते या अन्यायाविरोधात उभे राहतील व सुपारीला चांगला भाव मिळेल. याच उद्देशाने येथील काही महत्वाकांक्षी माणसे एकत्र आली व इ. स. १९३८ साली सुपारी संघ मुरुड ची स्थापना झाली. कै. गजानन कारभारी, कै. रामचंद्र कोर्लेकर, व कै. रामचंद्र गुरव या संघाच्या स्थापकांनी अक्षरशः स्वतः हमाली करून मुंबई येथे जाऊन १५, २० दिवस राहून सुपारी विकली. व हा अनुभव गाठीला बांधून सुपारी संघ उभा केला.
रचना –
सुपारी संघ चालविण्यासाठी एक संचालक मंडळ असते. संघाचे कामकाजावर लक्ष ठेवण्यासाठी एक नियंत्रण कमिटी असते. या नियंत्रण कमिटीमध्ये संचालक मंडळातील काही सदस्य असतात. हि नियंत्रण मॅकिती त्रिसदस्यीय असते व एक अध्यक्ष असतो. मालाच्या खरेदी विक्रीचे सर्व अधिकार या कमिटीकडे असतात. तसेच रोजच्या कामकाजाचे व्यवस्थापन पाहण्यासाठी एक व्यवस्थापक सुद्धा येथे नियुक्त केलेला असतो.
प्रक्रिया-
गावातील बागायतदार, शेतकरी त्यांची वाळवलेली सुपारी घेऊन सुपारी संघामध्ये येतात, व वजन करून सुपारी जमा केली जाते, त्याची नोंद प्रत्येकाच्या नावाने केली जाते. प्रत्येक सुपारी जमा करणाऱ्या शेतकऱ्याचे खाते संघामध्ये चालू केले जाते. दूर अंतरावरील गावातील सुपारी जमा करण्यासाठी संघाचे स्वतःचे टेम्पो असतात ते त्या त्या गावात जाऊन आठवड्याला सुपारी जमा करतात. जमा केलेली सुपारी साठवून ठेवण्यासाठी संघाचे गोदामे असतात. हि सुपारी पावसाळ्यामध्ये दमात हवेमुळे खराब होऊ नये म्हणून गोदामाच्या आतल्या बाजूने पेंढा लावला जातो व मध्ये सुपारी ठेवली जाते.
जमा झालेली अखंड सुपारी सोलली जाते व त्यातून रोठे काढले जातात. यासाठी स्थानिक स्त्रिया सुपारी संघामध्ये येऊन काम करतात. नंतर हे रोठे आकारानुसार वेगवेगळे केले जातात. त्यातील खराब व कमी दर्जाची सुपारी वेगळी काढली जाते. नंतर या सुपारीचे वजन करून पोत्यांमध्ये भरली जाते. या पोत्यांवर सुपारी संघ मुरुड चा शिक्का लावला जातो. व हा माल ठरलेल्या ठिकाणी पोचवला जातो.
सुपारीचा भाव कसा ठरवतात ?
सुपारी संघाच्या आत्तापर्यंत च्या ओळखीप्रमाणे सर्व व्यापाऱ्यांना सुपारीची उपलब्धता कळवली जाते. यामध्ये वाशी , मुंबई, सुरत, गुजरात चा काही भाग येथील व्यापाऱ्यांना समाविष्ट केले जाते. त्याप्रमाणे हे व्यापारी कुठल्या भावाने सुपारी घेणार ते कळवतात. नंतर संचालक मंडळाची सभा होते व या सभेमध्ये हे सर्व व्यापाऱ्यांचे भाव उघड केले जातात. व जो व्यापारी जास्त भाव देतो त्याला हि सुपारी मागणीप्रमाणे विकली जाते. व्यापारी त्यांच्या वाहतूक व्यवस्थेने सुपारी घेऊन जातात. नंतर आलेल्या पैशांतून सर्व खर्च वजा केले जातात, व उरलेले पैसे सर्व सभासदांना त्यांनी दिलेल्या सुपारीप्रमाणे वाटले जातात. याचवेळी सभासदांना व शेतकऱ्यांना सुपारीचा भाव कळतो, यालाच सुपारीचा भाव फुटणे असे म्हणतात. ना नफा ना तोटा या तत्वावर सर्व पैसे सभासदांमध्ये वाटले जातात.
‘सुपारी संघ मुरुड’ जपतोय समाजकार्याची भावना –
गावातील शेतकऱ्यांना जर गरज असेल तर सुपारीचा भाव फुटण्याआधी सुद्धा काही पैसे कर्ज स्वरूपात दिले जातात. व नंतर भाव फुटल्यावर कर्जाची रक्कम वजा करून उरलेले पैसे त्यांना दिले जातात. या सर्व व्यवहारामध्ये पूर्ण पारदर्शकता असते, हेच ह्या संघाचे वैशिष्ट्य आहे. तालुक्यातील सर्व सुपारी उत्पादकांना जास्तीत जास्त चांगला भाव मिळावा, कोणावरही अन्याय होऊ नये, या हेतूने आणि समाजकार्याची भावना जोपासत सुपारी संघाचे कामकाज गेली ७ ते ८ दशके अखंडपणे चालू आहे. आणि ह्याच सुपारी संघाची प्रेरणा घेऊन येथील काही कार्यकर्त्यांनी श्रीवर्धन येथेसुद्धा सुपारी संघाची स्थापना करून दिली आहे, जेणेकरून तेथील व्यवसाय सुद्धा सूत्रबद्धपणे चालू व्हावा व त्याचा फायदा तेथील सुपारी उत्पादकांना मिळावा.
‘सुपारी संघ मुरुड’ SSM – एक विश्वसनीय ब्रँड
उदात्त हेतूने केलेले कुठल्याही समाजकार्याची दाखल आपोआपच घेतली जाते. आणि ह्याचीच प्रचिती म्हणजे ‘सुपारी संघ मुरुड’. आज मुंबई, वाशी, सुरत, तसेच इतर बऱ्याच ठिकाणांच्या मोठमोठ्या घाऊक बाजारपेठांमध्ये SSM चे फक्त नाव पाहून निर्धास्तपणे लाखो करोडो रुपयांची सुपारी व्यापारी विकत घेतात. ह्यातील बरीच सुपारी देशाबाहेर निर्यातसुद्धा होते.
अशा या पारंपरिक व्यवसायाला, आपल्या मातीतल्या ब्रँड ला, मेहनतीला, एकोप्याला, alibagonline च्या भरघोस शुभेच्छा
- 112
- Traditional Business
- Comments Off on सुपारी संघ मुरुड (SSM)