Search
Sign In

पांढरा कांदा

पांढरा कांदा

पांढरा शुभ्र, चवीला गोड, व औषधी गुण असलेला अलिबागचा जगप्रसिद्ध पांढरा कांदा !!!

अलिबागच्या बऱ्याचश्या वैशिष्ट्यांपैकी एक. अलिबागच्या कांद्याची चव दुसऱ्या कुठल्याही कांद्याला नाही. पांढरा शुभ्र, चकाकी असलेला कांदा व त्याची पिळदार वेणी हि अलिबागच्या कांद्याची ओळख. या कांद्याचे औषधी गुणधर्म सुद्धा सर्वपरिचित आहेत. हि ओळख आता जगभर पोहोचलीय. अलीकडेच अलिबागच्या पांढऱ्या कांद्याला आंतरराष्ट्रीय भौगोलिक मानांकन (Geographical Indication ) मानांकन मिळाले आहे.

दिवाळीच्या सुमारास कांद्याची लागवड अलिबाग आणि परिसरात केली जाते. भातशेतीतील भात कापून झाला कि जमीन ओलसर असतानाच परत एकदा छोट्या प्रमाणात नांगरणी केली जाते. नंतर पाण्यासाठी जागा ठेऊन वाफे बनवले जातात. या वाफ्यात पुन्हा दलदल करून कांद्याची रोपे लावली जातात. कांद्याला शेण व सुकलेल्‍या मासळीचे नैसर्गिक खत दिले जाते. या खताने कांद्याची चव अजून छान येते. आधी आठवड्यातून तीन वेळा, मग दोन वेळा पाण्याची अशी पाळी देऊन पांढ-या कांद्याची रोपे जोपासली जातात. पाणी द्यायला पूर्वी रहाट असायचा, किंवा काही ठिकाणी विहिरीतून स्वतः पाणी काढून या वाफ्यांना द्यायचे. कांद्याची पात तयार झाली कि मधोमध एक तुरा येतो व वर एक झुपकेदार फुलांचा गुच्छ. आजकालच्या स्मार्टफोन मधील अँड्रॉइड चे Dandelion आठवले का ? अगदी त्याच्या तोडीस तोड असा हा गुच्छ असतो. कांदा तयार झाला कि उपटला जातो. कांद्याची उपटलेली रोपे शेतातच आडवी करून ठेवली जातात. त्यावर भाताचा पेंढा अंथरला जातो व कांदा काही दिवस सुकवतात, नंतर पहाटेच्या दवात त्याच्या लडी तयार करतात. लडी एकत्र बांधून कांद्याची माळ तयार केली जाते.

बऱ्याचशा घरांमध्ये कांद्याच्या या माळा माजघरात बांबूला बांधून ठेवतात. हा कांदा अगदी पावसाळा संपेपर्यंत टिकवतात. पांढरा कांदा खायचा म्हणजे मच्छी चे कालवण आणि भात या सोबत, तो पण हाताच्या एका मुठीखाली फोडून आणि सोबत उडिदाचा भाजलेला पापड. अहाहा !!! हा आनंद तुमच्या Oriental व Continental ला सुद्धा नाही.

पांढरा कांदा जसा चवीला गोड तसाच फार औषधी. सर्दी, खोकला, ताप, जखमेवर, फार उपयोगी. गावाकडे कोणाला उन्हाचा त्रास झाला, चक्कर किंवा फिट अली तर कांदा फोडून नाकाजवळ धरतात, कि लगेच बरे वाटायला लागते. कांद्यामध्ये Antiseptic, Antibiotic, Carmenative आणि Antimicrobial हे गुणधर्म आढळतात. असा का बहुगुणी कांदा उन्हाळ्यात मुबलक प्रमाणात अलिबाग आणि जवळपासच्या गावांमध्ये मिळतो. उन्हाळ्यात अलिबाग ला जाताना रस्त्याच्या दुतर्फा कांद्याच्या माळा घेऊन छोटे मोठे विक्रेते, माळणी दिसतात.

अलिबाग ला आलात कि हा कोकणचा मेवा घ्यायला विसरू नका.

  • 564
  • Farming
  • Comments Off on पांढरा कांदा

Sign In अलिबाग ऑनलाईन

For faster login or register use your social account.

[fbl_login_button redirect="" hide_if_logged="" size="large" type="continue_with" show_face="true"]
or

Account details will be confirmed via email.

Reset Your Password