वरसोली येथील खंडोबाचा इतिहास सांगणारे हे भव्य दिव्य मंदिर. अलिबागजवळील वरसोली येथील कोळीवाड्यामधे हे भव्य दिव्य मंदिर अलीकडेच बांधले आहे. मंदिराजवळील स्थानिक कोळी बांधवांनी या मंदिराविषयी व याच्या इतिहासाविषयी माहिती दिली
इतिहास –
फार पूर्वी वर्सोलीमध्ये काळूबुवा आणि मालूबुवा असे खंडोबाचे दोन भक्त राहत असत. त्यांनी एकदा जेजुरीला जाऊन खंडोबाची १५ वर्षे तपश्चर्या केली. त्यानंतर खंडोबा त्यांना प्रसन्न होऊन वरसोली येथे एका गोसाव्याच्या रूपात आला. परंतु तेथील लोकांनी त्याला ओळखले नाही. येथे जास्त करून मासेमार लोकांची वस्ती होती. खंडोबाला त्या लोकांनी ओळखले नसल्यामुळे त्यांनी त्या गोसावी रूपातील खंडोबाची अवहेलना केली व अपमानित केले. त्यावर खंडोबाने त्या लोकांवर भंडारा उधळून सांगितले कि तुम्ही समुद्रात जाल पण एकही मासा तुम्हाला मिळणार नाही. लोकांनी त्या बोलण्यावर विश्वास न दाखवता ते समुद्रात मासेमारीसाठी गेले. पण त्या मासेमारांना एकही मासा सापडला नाही. नंतर त्यांना कळून चुकले कि हा कोणी साधा गोसावी नसून कोणीतरी देवाचा अवतार आहे. परत येऊन पाहतात तर तो गोसावी तिथून निघून गेला होता.
श्री खंडोबा नंतर तिथून निघून मुळे या गावी एका तळ्याकिनारी एक दिवस थांबले व नंतर जेजुरी ला निघून गेले. मुळे या गावी खंडोबाच्या पादुका अजून आहेत व काळूबुवा आणि मालूबुवा यांची समाधी सुद्धा आहे. येथेच आजूबाजूला काळूबुवा आणि मालूबुवा यांच्या पुढील पिढीच्या सुद्धा बऱ्याच समाध्या पाहायला मिळतात. तसेच एक पुरातन दीपमाळ, दगडी चौथरा, दगडी कोरीवकाम केलेल्या पादुका, अशा गोष्टी पाहावयास मिळतात.
वरसोली येथे काळूबुवा आणि मालूबुवा यांचे जुने घर होते तेथेच आता मासेमार समाजाने एक भव्य मंदिर बांधले आहे. येथे ठिकठिकाणाहून भाविक दर्शनास येतात. तसेच ज्यांना जेजुरीस जाणे शक्य होत नाही ते भाविक सुद्धा येथे दर्शनास येतात. वर्सोलीच्या कोळीवाड्यामध्ये हे भव्य मंदिर आहे.
उत्सव –
वर्षातून चंपाषष्ठी, चैत्र पौर्णिमा, आषाढ शु प्रतिपदा, माघ पौर्णिमा , महाशिवरात्र , सोमवती, ह्या दिवशी येथे उत्सव साजरा केला जातो. तसेच प्रत्येक रविवारी सुद्धा येथे भाविक मोठ्या प्रमाणावर येतात.
असे हे खंडोबाचे भव्य दिव्य मंदिर अलिबाग ला भेट दिल्यावर जरूर पाहावे.
कसे पोहोचाल?
अलिबागमधून वरसोली येथे कोळीवाड्यामध्ये जावे. येथेच हे मंदिर स्थित आहे
- अलिबाग वरसोली अंतर २.५ किमी
- अलिबाग पुणे : १४५ किमी
- अलिबाग मुंबई :१२० किमी
जवळचे आकर्षण –
- वरसोली समुद्रकिनारा (१.५ किमी )
- खांदेरी किल्ला (६ किमी )
- अलिबाग समुद्रकिनारा (४ किमी )
Amenities
- Bike Parking
- Car Parking